परिचय

स्वागताध्यक्ष — महिला शासकीय अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली-२०२६

शासनाच्या विविध स्तरांवर काम करणाऱ्या महिला जेव्हा साहित्य निर्मिती करतात, तेव्हा त्यांच्या अनुभवांमध्ये एक वेगळे वैविध्य असते. प्रशासनात काम करताना त्यांचा संपर्क अगदी तळागाळातील सामान्य माणसांपासून ते धोरणकर्त्यांपर्यंत येतो. या संपर्कातून त्यांना मिळणारी अनुभूती आणि त्यांचे अनुभव त्यांच्या अभिव्यक्तीमध्ये उतरतात, ज्याचे दर्शन या दोन दिवसांच्या कार्यक्रमातून घडेल.

या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहत आहेत. आज केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्त्वाच्या पदांवर स्त्रिया निष्ठेने काम करत आहेत आणि त्यासोबतच आपले अनुभवही व्यक्त करत आहेत. हे वर्ष महाराणी ताराराणींच्या ३५१ व्या जयंतीचे वर्ष आहे. त्या एक कुशल प्रशासक होत्या आणि तेव्हापासूनची महाराष्ट्राची ही कुशल प्रशासनाची आणि साहित्याची परंपरा आजही जोमाने सुरू आहे.

प्रशासकीय अनुभवांबरोबरच साहित्यात दिलेले हे योगदान महाराष्ट्राच्या वाङ्मयीन आणि प्रशासकीय इतिहासामध्ये एक महत्त्वाची नोंद ठरेल. ५० टक्के लोकसंख्या असलेल्या महिलांचे प्रश्न आणि त्यांच्या मागण्यांना एक सक्षम व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे, आणि हे संमेलन त्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल असा मला विश्वास आहे.

— सुप्रिया देवस्थळी