महाराष्ट्रातील पहिल्या महिला शासकीय अधिकार्यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करताना सरहद संस्थेला मनस्वी आनंद होत आहे. तो यासाठी की हे पहिल्यांदाच दिल्लीला होत आहे. दुसरे असे की, भारतीय प्रशासकीय सेवा असो की भारतीय पोलीस सेवा. अगदी भारतीय परराष्ट्र सेवेपासून महसूल आणि अगदी लष्करी सेवेतही मराठी महिलांनी जगभर मराठीचा आणि पर्यायाने भारताचा झेंडा उंचावला आहे.
प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या तो तर महाराष्ट्रासाठी सुवर्णक्षण होता. ले. जन माधुरी कानीटकर या सैन्यातील पहिल्या महिला लेफ्टनंट जनरल तर सुजाता मनोहर यांची सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशपदी निवड होणे ही समस्त विधिक्षेत्रासाठी सुखद बातमी होती. आता नुकतीच सुनेत्राताई अजितदादा पवार यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री निवड झाली. या सर्व महिला आपापल्या कर्तृत्वाने या जागी पोहोचल्या.
या सर्व महिलांच्या कर्तृत्वाचा जागर करताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना कसे विसरता येईल अशी अनेक उदाहरणे पुढील पिढ्यांना प्रेरणा देत आहेत. आजही महाराष्ट्रातील शाळा, महाविद्यालयातच नाही तर जगभर त्यांच्या शौर्याच्या गाथा पुढच्या पिढीसाठी सांगितल्या जातात.
देशाच्या सीमावर्ती भागातील जनतेला मुख्यत: विधवा महिला आणि अनाथ मुलांना मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे काम करण्यासाठी स्थापन झालेल्या पुण्यातील सरहद संस्थेने पंजाब आणि नवी दिल्ली येथे अनुक्रमे 2015 आणि 2025 साली 88 व्या आणि 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले.
हे करताना संयोजन समितीतील सदस्य म्हणून मला एक गोष्ट अत्यंत तीव्रतेने जाणवली ती म्हणजे शासन, प्रशासनातील महिला प्रतिकूल परिस्थितीत अत्यंत कष्टाने अभ्यास करून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासनात येतात. अनेक महिला अधिकारी आपल्या कर्तृत्वाने परिसर आणि लोकमानस तेजांकित करतात. तो करताना त्यांच्यातील कवी, साहित्यीक, संवेदनशील कलाकार हळूहळू दूर जातो. मग त्या एका बाजूला घर संसार आणि दुसर्या बाजूला आपली जबाबदारी पार पाडतात. अशा महिलांना विशेषत: महाराष्ट्र केडर किंवा देशात इतरत्र महत्त्वाच्या पदांवर काम करणार्या मराठी महिलांना देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत व्यासपीठ मिळावे ही कल्पना पुढे आली.
प्रशासन, शौर्य, धैर्य मुत्सदेगिरी यांचा वापर करून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती राजाराम महाराज यांच्या निधनानंतर राज्यकारभार हातात घेऊन खर्या अर्थाने केवळ मराठा साम्राज्याला नाही तर देशाला वाचविणार्या महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून 2026 च्या मार्च महिन्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संमेलनाच्या निमंत्रक आर विमला, स्वागताध्यक्ष सुप्रिया देवस्थळी, स्मरणिकेच्या संपादक ऋता बावडेकर, उत्साही सहसंयोजक लेशपाल जवळगे, समन्वयक मयुर मसूरकर, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र परिचय केंद्र दिल्ली या केंद्राचे एकनाथ बागूल, मनिषा पिंगळे, स्मिता शेलार आणि या संमेलनासाठी उद्घाटक म्हणून येण्याचे मान्य केल्याबद्दल महाराष्ट्राचे लोकप्रिय मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या संमेलनासाठी काम करणार्या ज्ञात, अज्ञात सर्वांचे मनापासून आभार.
सध्या आकारात छोटे पण परिणामत: मोठे झालेल्या या साहित्य संमेलनाची वाटचाल आकारात आणि परिणामातही मोठी होत जाईल आणि ज्यांना व्यासपीठ मिळत नाही अशा मराठी अधिकारी महिला भगिनींना हे व्यासपीठ मिळेल असा विश्वास वाटतो.